ब्लॉग

भारतातील या ठिकाणी सगळ्यात सुंदर सुर्योदय आणि सुर्यास्त होतो !

तुम्ही न्यू-इयरला कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करताय का ? करत असाल तर आम्ही तुम्हाला एक मस्त ठिकाण सुचविणार आहोत. त्यामुळे तुमची नविन वर्षाची सुरुवात एकदम खास होईल.

तमिळनाडू राज्यातील शांत आणि सुंदर शहर म्हणजे कन्याकुमारी. यालाच भारतमातेचे चरणकमल असे देखील संबोधले जाते. कन्याकुमारीची सगळ्यात अनोखी ओळख म्हणजे येथील सुर्योदय आणि सुर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक देश-विदेशामधून येत असतात. येथे समुद्रतटावर सूर्योदय जसा दिसतो तसाच सूर्यास्तही. किनारपट्टीवर अशी संधी अन्यत्र कुठेही दिसत नाही. मात्र सूर्यास्त असो वा सूर्योदय दोन्ही पाहायला मिळणे म्हणजे चंद्रबळ चांगले असणे आवश्यक असते.

पूर्वेला बंगालची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंद महासागर अशा स्थानी वसलेले कन्याकुमारी आणखी एक अनोखा अनुभव पर्यटकांना देते. तीन्ही पाण्यांचे वेगवेगळे दिसणारे रंग लगेच समजतात.  या संगमाजवळच कन्याकुमारीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात पार्वती देवी कुमारीच्या रुपात अवतरली आणि तिने वाणासुराचा अंत केला. आपल्या नियोजित वराची वाट पाहात ती येथेच उभी राहिली मात्र तिचा वर आलाच नाही अशी अख्यायिका आहे. हे मंदिर तीन हजार वर्षापुर्वीचे आहे. येथे पहिले दुर्गा मंदिर आहे. या मंदिराची स्थापना खुद्द भगवान परशुराम यांनी केली होती. या मंदिराच्या बाहेर समुद्राच्या मध्यभागी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते. याच ठिकाणी त्यांची आकर्षक अशी भव्य मूर्ती आहे. ही मूर्ती पाहून पर्यटकाच्या डोळ्याचे पारणे फिटते.

येथे जवळच असलेल्या दुसर्‍या खडकावर तमीळ संतकवी तिरूवल्लूवर यांची १३३ फूट उंच मूर्ती आहे. पाच हजार शिल्पकारांनी ती घडविली असे देखील सांगितले जाते.

मंदिराजवळच काही अंतरावरच आहे महात्मा गांधींचे स्मारक. गांधींच्या अस्थी विसर्जनासाठी येथे आणल्या होत्या तेव्हा कांही काळ हा कलश या जागी ठेवण्यात आला होता. आता तेथेच हे स्मारक आहे. येथे कांही फोटो व अन्य वस्तूंचा संग्रह आहे.

त्यामुळे आता विचार काय करताय यंदाचे न्यू-इअर सेलिब्रेशन करायला जाणार ना.. कन्याकुमारीला..

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of