विदेश

बगदादमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला

अमेरिका आणि इराण मधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच आता बगदादमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

यापूर्वीही ५ जानेवारी रोजी बगदादच्या ग्रीन झोनमध्ये इराण समर्थक मिलिशियानं कत्युशा रॉकेटचा मारा केला होता. त्यावेळी काही रॉकेट अमेरिकन दुतावासाच्या आत पडले होते. हल्ल्यादरम्यान ग्रीन झोनमधील सायरन वाजत होते. एक रॉकेट अमेरिकन दुतावासापासून १०० मीटर अंतरावर पडलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. रॉयटर्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ग्रीन झोनच्या आत दोन कत्युशा रॉकेट डागण्यात आले. परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इराणनं बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इरबिल, अल असद आणि ताजी या लष्करी हवाई तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अमेरिकेचे ८० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला होता. कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला असल्याचं इराणकडून सांगण्यात आलं होतं. या हल्ल्यानंतर अमेरिकेनं आखाती देशात जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला होता.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of