सांगली – महाराष्ट्राला मदत करण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी व मदतीसाठी केंद्राने तातडीने एनडीआरएफ पथक पाठवावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पत्राद्वारे केल्याचं देखील माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करावी लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या बाबतीत राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास 50 हजार कोटी इतकं शेतीचे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने 75 व 25 टक्के तातडीने मदत केली पाहिजे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. राज्यात शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे करून मदत देण्यासाठी केंद्राने एनडीआरएफ पथके पाठवायला हवी, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of