भाजपा आणि शिवसेनेचे सरकार असतानाही आमच्यात खटके उडत नव्हते का? खटके उडतच होते. महाविकास आघाडीत खटके उडत नाहीत, खटका हा शब्द आम्ही नाही, मीडियाने वापरला. असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
खटका हा शब्द मीडियाने मनातून काढून टाकावा असाही सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्यात चांगल्या प्रकारे समन्वय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीत समन्वय समिती आहे. त्यात तिन्ही पक्षाचे दोन-दोन प्रमुख नेते आहेत, कोरोनामुळे संवाद कमी झाला आहे, मात्र तिन्ही पक्ष एकत्रपणेच चर्चा करुन निर्णय घेतात, थोरातांनीही परखडपणे आपली भूमिका स्पष्ट केली, असं राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीत अंतरविरोध, अंतरपाट नाही, आम्ही वरमाला घातल्या आहेत, महाविकास आघाडी सरकार हे खिचडी नाही, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.