महाराष्ट्र मुंबई

एक्सपोर्ट प्रमोशन स्कीमला गती देण्याच्या वित्तमंत्र्यांच्या सूचना

मुंबई

राज्यातील निर्यात वाढावी, निर्यातीस अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीने  येत्या आठ दिवसात एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम संदर्भात बैठकीचे आयोजन करून राज्यातील निर्यात कशी वाढवता येईल यादृष्टीने  चर्चा करावी,  अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

आज इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोट कौन्सीलच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी एक्सपोर्ट प्रमोशन स्कीमसंदर्भात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस  या कौन्सीलच्या पदाधिकाऱ्यांसह नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल,  वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचे योगदान १५ टक्के आहे. देशातील औद्योगिक उत्पादन आणि नक्त मुल्यवृद्धीमध्ये राज्याचा हिस्सा २० टक्के आहे. राज्यातील आश्वासक औद्योगिकरणामुळे सेवा क्षेत्राचा स्थूल उत्पन्नातील वाटा ५५ टक्क्यांच्या आसपास आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच औद्योगिकरणाला चालना मिळण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देणारे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे.  महाराष्ट्राचा राष्ट्रीय निर्यातीतील वाटा २४.९५ टक्के आहे. ही टक्केवारी अधिक वाढण्याच्यादृष्टीने शासन प्रयत्न करत आहे त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे, या समितीमध्ये इंजिनिअरिंग एक्सपोर्ट कौन्सीलच्या पदाधिकाऱ्यांचा ही समावेश करण्यात यावा व त्यांची ही मतं अभ्यासली जावीत, असेही श्री.मुनगंटीवार म्हणाले.

इंजिनिअरिंग एक्सपोर्ट कौन्सीलचे १३ हजार सदस्य आहेत. वेस्टर्न झोनमधून होणारी सर्वाधिक निर्यात लक्षात घेता याला अजून प्रोत्साहित कसे करता येईल यादृष्टीने सुनियोजित पाऊले टाकण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नियमित बैठका व्हाव्यात, असेही ते म्हणाले. इंजिनिअरिंग एक्सपोर्ट कौन्सीलच्या मूल्यवर्धित कराच्या परताव्यासंदर्भातील प्रश्न वस्तू आणि सेवा कर आयोगाने फास्ट ट्रॅक पद्धतीने सोडवावा, इलेक्ट्रीसिटी ड्युटी नको असे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे म्हणणे आहे, त्यासंदर्भात अभ्यास केला जावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of