क्रीडा

भारताने जिंकलेला 2011 चा वर्ल्ड कप फिक्स होता ? श्रीलंकन पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

भारताने जिंकलेला 2011 चा वर्ल्डकप फिक्स होता असा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यामुळे श्रीलंकेच्या सरकारने या आरोपांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. याच चौकशीचा भाग म्हणून त्यावेळचा श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराची चौकशी करण्यात आली आहे.

कुमार संगकाराची क्रीडा मंत्रालयाच्या स्पेशल इनव्हेस्टिगेशन युनिटने 10 तास कसून चौकशी केली. त्याआधी श्रीलंका टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष राहिलेल्या अरविंदा डिसिल्वा यांचीही चौकशी करण्यात आली.

कुमार संगाकारा, महेला जयवर्धने, उपुल थरंगा आणि तत्कालीन निवड समिती अध्यक्ष अरविंदा डी सिल्वा यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर श्रीलंकन पोलिसांनी हा तपास सबळ पुरावे नसल्याने बंद केला. “सर्व खेळाडूंची दीर्घकाळ चौकशी करण्यात आली. आम्ही त्यांच्या स्पष्टीकरणावर समाधानी आहोत. आम्ही या प्रकरणाचा तपास बंद करत आहोत. अंतिम सामन्यात आयत्या वेळी करण्यात आलेल्या बदलाबाबत साऱ्यांनी पटेल असे स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या तपासात आम्हाला कोणत्याही प्रकारच्या फिक्सिंगचे धागेदोरे आढळले नाहीत”, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या मॅचमध्ये श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने टॉस जिंकून पहिला बॅटिंगचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेने शतक करून श्रीलंकेचा स्कोअर 274/6 पर्यंत पोहोचवला होता. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सचिन, सेहवाग आणि विराट कोहलीच्या विकेट 31 रनवरच गमावल्या होत्या. सुरुवातीच्या धक्क्यानंतर गौतम गंभीर आणि धोनीने 109 रनची पार्टनरशीप करून भारताला दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकवून दिला.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of