पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांच्या नातवाचा, शर्विन ऊर्फ चिकू (वय २०), याचा आकस्मिक मृत्यू रविवारी झाला. ही बातमी समजताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून सामाजिक, राजकीय व प्रशासकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आजी-आजोबांचा लाडका ‘चिकू’ गेला!
शर्विन हे कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपुत्र होते. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि बुद्धिमान म्हणून त्यांची ओळख होती. सध्या ते वकिलीचे शिक्षण घेत होते आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत होते. परंतु, त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवारी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून अंतिम श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या दशक्रिया विधीचे आयोजन शनिवारी, १९ एप्रिल रोजी मुंबई येथे करण्यात आले आहे.
पलांडे कुटुंब हे शिरूर तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठित व प्रभावशाली कुटुंब म्हणून ओळखले जाते. सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांनी आमदार म्हणून कार्यरत असताना अनेक सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवले होते. त्यांचे सुपुत्र संजीव पलांडे हे सध्या कोकण भवन येथे उपायुक्त पदावर कार्यरत असून, त्यांनी देखील आपल्या कार्यदक्षतेने प्रशासकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शर्विनच्या अचानक जाण्याने केवळ पलांडे कुटुंबच नव्हे, तर शिरूर तालुक्यातील आणि मुंबईतील त्यांचे मित्र, नातेवाईक, सहाध्यायी यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे स्वप्न अधुरे राहिले, पण त्यांच्या आठवणी कायम राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच सर्वांची प्रार्थना.